बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु ऐन पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात डीएपी व इतर खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवरील डीएपीचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तर काही ठिकाणी तुटवड्याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात आहे, या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा परिषदेत धडक देत कृषी विकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी तुपकरांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर भरत शेतकऱ्यांसाठी खताचा बफर स्टॉक तत्काळ खुला करून देण्याची मागणी केली.
जिल्हाभरात डीएपी व इतर खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. खतांसाठी शेतकरी कृषी केंद्रांच्या चकरा मारत आहेत परंतु त्यांना खते मिळत नाही तर काही ठिकाणी दुप्पट दराने शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे ही परिस्थिती पाहता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक, अमोल मोरे, गजानन भोपळे, गुरुदत्त बाप्पू, अमीन खासाब, राम अंभोरे, पवन काकडे, राहुल शेलार, दत्ता जेऊघाले, नितीन सोनटक्के, भीमराव हिवरकर, ऋषीं भोपळे, विश्वास पाटील, कैलास उतपूरे, सुरेश खरात, अनंता गाडे, विष्णु पवार, मेहेंद्र जाधव, विजय गायकवाड, अनंता हिवरकर, यांच्यासह चिखली व मेहकर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसह थेट जिल्हा परिषद गाठून कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला. रविकांत तुपकर यांनी कृषी अधिकारी यांना धारेवर धरत तत्काळ कृषी चालकांची चौकशी करून खाते उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरल. “रॅक लागली नाही, उद्या लागेल, परवा लागेल” अशी केवळ थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. याच तुटवड्याचा गैरफायदा घेत काही विक्रेत्यांकडून चढ्या दराने डीएपी खत विक्री होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे हा प्रकार तत्काळ थांबविणे आवश्यक असल्याचे यावे रविकांत उपकर यांनी सांगितले. कृषी अधिकारी चर्चा करत असतानाच रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करत जिल्ह्यासाठी राखीव ठेवलेला डीएपी खताचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) तातडीने खुला करण्याची मागणी केली. तसेच चिखली तालुक्याचा खत कोटा वाढविणे, शासनमान्य दरात पारदर्शक पद्धतीने खत वितरण करणे, काळाबाजार रोखणे, प्रत्येक तालुक्याला मिळालेल्या साठ्याची माहिती जाहीर करणे आणि पुढील १५ दिवसांसाठी नियमित पुरवठ्याचे नियोजन करणे या मागण्या यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. संघटनेचे पदाधिकारी विनायक सरनाईक व डॉ. ज्ञानेश्वर टाळे यांनी कृषी विकास अधिकारी इंगळे यांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या भावना प्रशासनापुढे मांडल्या.
‘दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर आंदोलन अटळ’
आम्ही केलेल्या मागण्यांची प्रशासनाने दोन दिवसात पूर्तता करावी. शेतकऱ्यांना आवश्यकती रासायनिक खते उपलब्ध करून द्यावी, डीएपीचा बफर स्टॉक खुला करावा. खतांसाठी शेतकऱ्यांचे आर्थिक लूट झाल्यास कृषी विभागाच्या चिखली व बुलढाणा येथील कार्यालयांवर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.“शेतकऱ्यांची लूट आणि खतांचा कृत्रिम तुटवडा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने तातडीने बफर स्टॉक खुला करावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा यावे रविकांत तुपकर यांनी दिला.













