साखरखेर्डा (प्रतिनिधी):तालुक्यातील मौजे गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन ५ जण जखमी झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर १९ फेब्रुवारी रोजी एका आरोपीस अटक करण्यात आली होती. त्यानंतर इतर आरोपी फरार होते.
तपासादरम्यान पोलिसांनी शाम सुरेश तुपकर, पवन परसराम तायडे आणि अक्षय रामकिशन तुपकर या तिघांना २० मार्च रोजी अटक केली. सुरुवातीला न्यायालयाने त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर २१ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध सुरू असताना १ एप्रिल रोजी अमोल सुरेश तुपकर, गजानन केशव तुपकर, ऋतिक गजानन तुपकर आणि कडूबा मनोहर तुपकर या चार आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर २ एप्रिल रोजी पुन्हा कोर्टात हजर केल्यानंतर सर्व चार आरोपींना बुलढाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश माधवराव तुपकर यांनी मेहकर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर साहाय्यक सरकारी वकील विनोद नरवाडे पाटील यांनी जोरदार युक्तिवाद करत जामीन नाकारण्याची बाजू मांडली. न्यायालयाने ७ एप्रिल रोजी हा जामीन अर्ज फेटाळला.
या प्रकरणाचा पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करत आहेत.













