बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यात पोरी बेपत्ता होण्याचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. अवघ्या २४ तासांत चार तरुणी आणि महिला वेगवेगळ्या ठिकाणाहून अचानक गायब झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बोराखेडी, धामणगाव बढे, नांदुरा आणि जळगाव जामोद या भागातून या घटना घडल्या असून, सगळीकडेच भीती आणि संतापाचं वातावरण तयार झालं आहे.
मोताळा तालुक्यातील वाघजाळ गावातील २० वर्षीय निता वाघमारे ही २० मार्च रोजी “संडासला जाते” असं सांगून घराबाहेर पडली, पण परतलीच नाही. घरचे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेलेले असताना ही घटना घडल्याने संशय अधिकच वाढला आहे.
धामणगाव बढे येथे १८ वर्षीय आसीबा तडवी ही रात्रीच्या वेळी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. दोन दिवस उलटूनही तिचा काहीच पत्ता लागलेला नाही, त्यामुळे कुटुंबीय धास्तावले आहेत.
नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील १८ वर्षीय कांचन चरखे ही “दुकानातून सामान आणते” असं सांगून घराबाहेर गेली आणि गायब झाली. तिच्या शोधासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत, पण अजूनही काही धागादोरा लागलेला नाही.
जळगाव जामोद तालुक्यातील रसुलपूर येथील २४ वर्षीय राफिया तडवी ही १६ मार्चपासून बेपत्ता आहे. “काकाच्या घरी जाते” असं सांगून गेलेली राफिया चार दिवस उलटूनही परतली नसल्याने पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एकाच दिवशी चार-चार पोरी गायब होणं, हा साधा योगायोग नसल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियातून ओळख करून फसवणूक किंवा आमिष दाखवून पळवून नेण्याचे प्रकार वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, या मुलींबाबत कुठलीही माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्याशी संवाद वाढवण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.












