Advertisement Advertisement

“ लाडक्या बहिणींना पुन्हा चुलीवर आणलं!” चिखलीत काँग्रेसचा हल्लाबोल..! चिखलीत गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन; तहसीलदारांना घेराव….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ चिखली येथे काँग्रेसच्या वतीने गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांना घेराव घातला व दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत सांगितले की, सत्तेत आल्यापासून सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात वारंवार वाढ केली आहे. काँग्रेसच्या काळात सुमारे ४०० रुपयांवर असलेला सिलेंडर आता ९०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही सुमारे १५० रुपयांची वाढ झाल्याने त्याची किंमत १९०० रुपयांच्या जवळ गेली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कुटुंबीय बजेट कोलमडले असून महिलांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे, असा आरोप त्यांनी केला.

आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक निषेध म्हणून गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढली. महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. “गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करा”, “लाडक्या बहिणींना लुटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो”, “महागाईचा झटका लाडक्या बहिणींना फटका” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

दरम्यान, निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार कार्यालयाबाहेर न आल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घालत केंद्र सरकारने गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.

या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, शहर अध्यक्ष जाकीर शेख, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा संगिताताई गाडेकर, शहर अध्यक्षा विद्याताई देशमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!