Advertisement Advertisement

देऊळगाव राजाचे निसर्गवैभव आगीच्या विळख्यात समाजकंटकां कडून वनराई नष्ट करण्याचा प्रयत्न; स्वयंसेवक आणि प्रशासनाची धावपळ…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या महादेव खोरा परिसरातील हिरवाईला अज्ञात समाजकंटकांनी आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ८ मार्च रोजी सायंकाळी उघडकीस आली. जाफराबाद बायपास रोडलगत सामाजिक वनीकरण विभाग आणि नगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांतून उभी राहिलेली ही हिरवीगार वनराई आगीच्या विळख्यात सापडल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाफराबाद बायपास लगत असलेल्या या वनक्षेत्रात ८ मार्चच्या सायंकाळी अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी धूर आणि ज्वाळा दिसताच तत्काळ माहिती दिली. ही आग नैसर्गिक नसून कुणीतरी जाणीवपूर्वक लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील जैवविविधता आणि शेकडो झाडांना मोठा धोका निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच ‘धरती बचाओ मिशन’ आणि ‘ग्लोबल इंडिया फेडरेशन’ या संस्थांचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहेत्रे, दुर्गेश बनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नगर परिषद प्रशासनालाही याची माहिती देण्यात आल्यानंतर मुख्याधिकारी मोकळ आणि शिंपणे यांनी तातडीने यंत्रणा कार्यान्वित करून आग विझवण्यासाठी मदत केली.
स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. मात्र या घटनेमुळे परिसरातील झाडे, वन्यजीव आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही या परिसरातील वनराईला आग लावून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रकरणातील दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!