सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील ‘किरण बार’समोर किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत होऊन एका तरुणावर तसेच त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या साक्षीदारावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सावखेड तेजन येथील रहिवासी सुभाष कारभारी जायभाये (वय ४४) हे २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ‘किरण बार’समोर उभे होते. त्यावेळी आरोपी महेश ज्ञानदेव सोनुने आणि एका साक्षीदारामध्ये शाब्दिक वाद सुरू होता. वाद मिटविण्याच्या उद्देशाने सुभाष जायभाये हे दोघांना समजावण्यासाठी मध्ये पडले असता आरोपी संतापला व त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागला. वाद वाढू नये म्हणून सुभाष जायभाये हे मोटारसायकलवरून निघून जात असताना आरोपीने त्यांची गाडी अडवून पाठीमागून चाकूने सपासप वार केले.
दरम्यान, सुभाष जायभाये यांना वाचवण्यासाठी व आरोपीला पकडण्यासाठी घटनास्थळी असलेले साक्षीदार धावून आले असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी व साक्षीदार दोघेही जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सिंदखेड राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी सुभाष जायभाये यांच्या तक्रारीवरून आरोपी महेश ज्ञानदेव सोनुने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ११८(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रभाकर सानप करीत आहेत.














