चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या २६ वर्षीय निवासी डॉक्टरने नागपुरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात तसेच चिखली परिसरात शोककळा पसरली आहे.
ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) असे मृत डॉक्टरचे नाव असून, तो मूळचा चिखली येथील रहिवासी होता. ऋत्विकने मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. दोन्ही पालक डॉक्टर असलेल्या ऋत्विकला नागपूर मेडिकल कॉलेजच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नुकताच प्रवेश मिळाला होता. तो २७ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयात रुजू झाला होता.
ऋत्विक हा विभागप्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये कार्यरत होता. नागपूर येथील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता. सोमवारी तो कॉलेजमध्ये उपस्थित न राहिल्याने विभागप्रमुखांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर वडिलांनी वारंवार फोन करूनही ऋत्विककडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यात आला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावून पाहिला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता ऋत्विक मृतावस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे ठाकूर कुटुंबावर मोठा आघात झाला असून, सहकारी डॉक्टर, मित्रपरिवार आणि वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.











