अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज): विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता खरी राजकीय रंगत सुरू झाली आहे. नामनिर्देशनाच्या पाचव्या दिवशी सोमवारी तब्बल ११ उमेदवारांनी १८ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आतापर्यंत एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, ६ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
सोमवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे नाव म्हणजे विद्यमान आमदार किरण सरनाईक. त्यांनी शिवसेना तसेच अपक्ष अशा स्वरूपात नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. दुसरीकडे भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव यांनी भाजप तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण आणि त्यानंतर कोणाची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीतील उमेदवारीवरून आधीपासूनच सुरू असलेल्या हालचालींना भोयर यांच्या अर्जामुळे आणखी वेग आला आहे.
दरम्यान, शिक्षक भारतीचे सुरेश देवकर यांनी समाजवादी गणराज्य पार्टी तसेच अपक्ष अशा स्वरूपात अर्ज दाखल केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दत्तात्रय श्रीराम लहाने यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसने यापूर्वीच अदिती पोहरे यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीतही वेगवेगळे चेहरे मैदानात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतविभाजनाची शक्यता राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.
११ चेहरे, १८ अर्ज; बहुरंगी लढतीचे संकेत….
सोमवारी नामनिर्देशन दाखल करणाऱ्यांमध्ये दिलीप भिमराव कडू, डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे, दत्तात्रय श्रीराम लहाने, सुरेश बाबुराव देवकर, गजानन गोविंदराव डोके, भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव, सुनील दुर्गादास राठोड, सुरेशराव पवार, सुमित, गजानन रामचंद्र उल्हे, किसनराव रामराव सरनाईक आणि अविनाश मधुकर बोर्डे यांचा समावेश आहे.
यापैकी काही उमेदवारांनी पक्षासोबतच अपक्ष म्हणूनही नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. त्यामुळे एका दिवसात ११ उमेदवारांकडून १८ अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय सोमवारी १५ व्यक्तींनी तब्बल ३० नामनिर्देशनपत्रे उचलली आहेत. त्यामुळे अंतिम दिवशी आणखी काही नवी नावे मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुतीसमोर आव्हान; मविआतही वेगवेगळे चेहरे…..
अमरावती शिक्षक मतदारसंघाची यंदाची निवडणूक केवळ पक्ष विरुद्ध पक्ष अशी सरळ राहिलेली नाही. महायुतीतील इच्छुक, महाविकास आघाडीतील स्वतंत्र उमेदवारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार यामुळे निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे झाले आहे.
महायुतीमध्ये अमरावतीची जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इच्छुकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपचे चंद्रशेखर भोयर यांनी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत चर्चेला आणखी उधाण आले आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या अदिती पोहरे आणि ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने मैदानात असल्याने मविआसमोरही मतांचे विभाजन रोखण्याचे आव्हान असणार आहे.
६ ऑक्टोबर अंतिम दिवस; ९ ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होणार….
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता संपणार आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर ९ ऑक्टोबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
त्यामुळे उद्याचा अंतिम दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कोण अर्ज दाखल करणार, कोण माघार घेणार आणि कोण बंडखोरी कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ९ ऑक्टोबरनंतरच प्रत्यक्ष मैदानात किती उमेदवार उरतात आणि निवडणुकीचे अंतिम चित्र काय असेल, हे स्पष्ट होणार आहे. मात्र सोमवारी दाखल झालेल्या १८ नामनिर्देशनपत्रांमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची लढत चांगलीच रंगात आल्याचे स्पष्ट झाले आहे.















