बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्यात भाजप आणि शिवसेना महायुतीच्या सत्तेचा गाडा एकत्र चालत असला, तरी बुलढाण्यात मात्र महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांचे सूर काही जुळताना दिसत नाहीत. विद्यमान शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यावेळी वादाचा मुद्दा ठरला आहे तो थेट बुलढाणेकरांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाणीपुरवठ्याचा!
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना पेनटाकळी धरणावरून बुलढाणा शहरासाठी उभारण्यात आलेल्या सुमारे १६ कोटी रुपयांच्या दोन जुन्या पाणीपुरवठा योजनांच्या पाइपलाइन गायब झाल्याचा गंभीर आरोप माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी हा आरोप फेटाळून लावत जुन्या जलवाहिन्यांचा ७० ते ७५ टक्के भाग नव्या पाणीपुरवठा योजनेत वापरल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरून महायुतीतील दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
माझ्या काळात १६ कोटींच्या दोन योजना उभारल्या, मग पाइपलाइन गेल्या कुठे?
माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, २००६ ते २०१० या आमदारकीच्या कार्यकाळात बुलढाणा शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पेनटाकळी धरणावरून सुमारे ४ कोटी आणि १२ कोटी रुपये खर्चाच्या अशा दोन समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.
आज जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना या दोन्ही योजना सुरू असत्या, तर बुलढाणेकरांना मोठा दिलासा मिळाला असता. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या योजनांच्या पाइपलाइनच गायब झाल्याची माहिती समोर येणे गंभीर बाब असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. या योजना आज नव्याने उभारायच्या झाल्यास शासनाला शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागतील, असा दावाही त्यांनी केला.
नगर परिषद आणि जीवन प्राधिकरणामार्फत चौकशी करा!
पाइपलाइन गायब झाल्याच्या आरोपाची नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून सखोल चौकशी करावी. नेमक्या किती पाइपलाइन अस्तित्वात आहेत, किती गायब झाल्या आणि याला जबाबदार कोण, याची निश्चिती करण्यात यावी. दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, तसेच जुन्या दोन्ही पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ववत कार्यान्वित कराव्यात, अशा मागण्या विजयराज शिंदे यांनी केल्या आहेत.
‘पेनटाकळी धरणाचे पाणी बुलढाणेकरांच्या हक्काचे आहे,’ अशी भूमिका घेत दुष्काळाच्या काळात शहराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी जुन्या योजनांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पाइपलाइन गायब झालेल्याच नाहीत; जुन्या जलवाहिन्या नव्या योजनेत वापरल्या!
दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. जुन्या आठ इंची जलवाहिन्या कालबाह्य झाल्यामुळे नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात त्यांचा वापर करण्यात आल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
जुन्या जलवाहिन्यांपैकी तब्बल ७० ते ७५ टक्के भाग शहरातील जलवाहिनी जाळ्याच्या विस्तारासाठी वापरण्यात आला आहे, तर उर्वरित भाग खराब झालेला आहे. यासंदर्भातील नोंदी शासकीय अभिलेखात उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे पाइपलाइन चोरीला गेल्याचा किंवा गायब झाल्याचा आरोप चुकीचा असल्याची भूमिका गायकवाड यांनी मांडली आहे.
दररोज ११ लाख लिटर पाण्याची बचत; नव्या योजनेचे काम ७५ टक्के पूर्ण!
आमदार गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, पाणीगळती रोखल्यामुळे दररोज सुमारे ११ लाख लिटर पाण्याची बचत होत आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम ७० ते ७५ टक्के पूर्ण झाले असून, यामध्ये २ किलोमीटर अंतर्गत जलवाहिन्या आणि ७५ किलोमीटर मुख्य जलवाहिन्यांचा समावेश आहे. पुढील ११ महिन्यांत नियोजित कामे पूर्ण करण्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मात्र, एकीकडे दररोज लाखो लिटर पाण्याची बचत होत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे बुलढाणा शहरातील नागरिकांना आठवडाभरानंतर पाणी मिळत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नव्या योजनेचा प्रत्यक्ष फायदा नागरिकांच्या नळापर्यंत कधी पोहोचणार, हा प्रश्न कायम आहे.
महायुती एकत्र, पण बुलढाण्यात नेत्यांचे सूर वेगळेच!
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यातील राजकीय मतभेद काही नवीन नाहीत. राज्यात भाजप आणि शिवसेना महायुतीच्या माध्यमातून सत्तेत एकत्र असले, तरी बुलढाण्यात मात्र दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष वारंवार चव्हाट्यावर येतो. आता पाण्यासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रश्नावरून दोघांनीही एकमेकांच्या भूमिकेला छेद दिला आहे.
शिंदे यांच्या मते कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पाइपलाइन गायब झाल्या आहेत, तर गायकवाड यांच्या मते जुन्या जलवाहिन्यांचा बहुतांश भाग नव्या योजनेत वापरण्यात आला आहे. त्यामुळे नेमके सत्य काय, हे आता अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे.
नेत्यांचा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू; मात्र बुलढाणेकरांच्या नळाला पाणी कधी?
एकीकडे जुन्या पाइपलाइनवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, तर दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बुलढाणेकरांना नियमित पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे. शहरातील नागरिकांना आठवडाभर पाण्यासाठी वाट पाहावी लागत असेल, तर कोट्यवधींच्या योजनांचा नेमका उपयोग काय, असा सवालही उपस्थित होत आहे.
आता जिल्हा प्रशासन विजयराज शिंदे यांच्या मागणीनुसार चौकशी करणार का? जुन्या जलवाहिन्यांचा नव्या योजनेत किती वापर झाला, याचा अधिकृत हिशेब जनतेसमोर येणार का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, राजकीय वाद बाजूला ठेवून बुलढाणेकरांना नियमित पाणीपुरवठा कधी मिळणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
















