Advertisement Advertisement

सरकारी जागेची नोंद परस्पर खासगी व्यक्तीच्या नावावर! तत्कालीन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल! न्यायालयाच्या आदेशानंतर साखरखेर्डा पोलिसांची कारवाई; विभागीय चौकशीही सुरू….

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीतील सरकारी मालकीच्या जागेची नोंद कथितरीत्या एका खासगी व्यक्तीच्या नावावर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिंदी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक दिनकर सीताराम काळे यांच्याविरुद्ध साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंदखेडराजा न्यायालयाच्या आदेशानंतर १ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी अशोक आत्माराम खरात यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, शिंदी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीतील सरकारी मालकीची जागा एका व्यक्तीच्या वैयक्तिक नावावर नोंदविल्याचा आरोप आहे. ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक ८-अ मधील मालमत्ता नोंदीत हा कथित फेरबदल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या तक्रारीच्या आधारे साखरखेर्डा पोलिसांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.१९ वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८ (४), ३३६ (३) आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल निवृत्ती रंगनाथ पोफळे करीत आहेत. ग्रामपंचायतीचे अभिलेख, मालमत्तेच्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करून पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती ठाणेदार युवराज रबडे यांनी दिली.

दरम्यान, तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे यांच्याविरुद्ध पंचायत समिती स्तरावर विभागीय चौकशीही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सरकारी मालकीच्या जागेची नोंद खासगी व्यक्तीच्या नावावर कशी झाली, यामागे नेमकी काय वस्तुस्थिती आहे आणि तपासात कोणती कागदपत्रे समोर येतात, याकडे शिंदी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!