Advertisement Advertisement

चिखलीत पाण्याचा हाहाकार! बोअर-विहिरी एकदम ठणठणाट… नागरिकांचे हाल बेहाल! ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ फक्त कागदावरच…

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): शहर आणि परिसरात यंदाच्या निर्माण झालेली पाणीटंचाईची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर मोठे जलसंकट उभे ठाकले आहे. गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच घरगुती बोअरवेल, विहिरी आणि शेतातील पाण्याचे स्त्रोत एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्णपणे आटल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. शहरासह ग्रामीण भागातील शेकडो बोअरवेल आणि विहिरींनी अचानक तळ गाठल्याने नागरिकांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करावा लागत आहे.

या भीषण परिस्थितीमागे निसर्गापेक्षा मानवनिर्मित कारणे अधिक जबाबदार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील जवळपास सर्व प्रमुख रस्ते, अंतर्गत गल्ल्या आणि मोकळ्या जागांचे मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. विकास आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेल्या या काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी आवश्यक असलेली मोकळी मातीच शिल्लक राहिलेली नाही.

परिणामी, पावसाळ्यात पडणारे लाखो लिटर पाणी थेट सिमेंटच्या रस्त्यांवरून वाहत नाल्यांमार्फत शहराबाहेर निघून जाते. भूगर्भातील पाण्याचे नैसर्गिक पुनर्भरण थांबल्याने याचा थेट परिणाम आता उन्हाळ्यात दिसून येत असून भूजल पातळी धोकादायकरीत्या खालावली आहे. त्यामुळे अनेक घरगुती बोअरवेल आणि विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत.

ग्रामीण भाग आणि शेतांमधील परिस्थितीही तितकीच गंभीर बनली आहे. पूर्वी शेतांमध्ये पाणी अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतबांध आणि बांधबंदिस्ती केली जात होती. त्यामुळे पावसाचे पाणी जागेवरच अडून जमिनीत मुरत असे. मात्र, बदलत्या काळात या बांधांकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाचे पाणी थेट वाहून जात आहे.

एकेकाळी अत्यंत प्रभावी ठरलेली ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना आता केवळ घोषणांपुरती मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून राबवलेल्या या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतातील विहिरी आणि पाचशे ते सहाशे फूट खोल गेलेले बोअरवेलदेखील एका रात्रीत कोरडे पडत आहेत.

या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक, शेतकरी आणि पशुपालक यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शेती आणि जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी शहरात पावसाचे पाणी जमिनीत मुरेल, अशा उपाययोजना राबवणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करणे, शेतबांध मजबूत करणे आणि ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवणे काळाची गरज बनली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!