बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत सापडलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. २४ जून रोजी जिल्ह्याच्या बहुतांश भागात झालेल्या दमदार पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले असून जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे खरीप पेरणीच्या कामांना आता वेग येण्याची चिन्हे आहेत.
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून सक्रिय होण्यास विलंब झाला. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच मशागत करून पेरणीची तयारी पूर्ण केली होती; मात्र पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. गेल्या चार-पाच दिवसांत मान्सून सक्रिय झाल्याने जिल्ह्यात समाधानकारक पावसाची सुरुवात झाली आहे.
बुलढाणा शहरात २३ जूनच्या सायंकाळी हलक्या सरी कोसळल्यानंतर २४ जून रोजी सकाळपासून वातावरण ढगाळ झाले आणि सकाळी दहाच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधनेश्वर परिसरात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून येळगाव धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मोताळा तालुक्यातही धुव्वाधार पाऊस झाला. अजिंठा पर्वतरांगातून उगम पावणाऱ्या नळगंगा नदीला पहिल्याच पावसात पूर आला. वडगाव परिसरातील नदीसह मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील शेलार नदीलाही पूर आला. चिखली, संग्रामपूर, नांदुरा, खामगावसह अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, २४ जून २०२६ अखेर जिल्ह्यात सरासरी ३३.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या ४.३६ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत ६३.७ मिमी पाऊस झाला होता. तालुकानिहाय आकडेवारीनुसार शेगाव तालुक्यात सर्वाधिक ५६.९ मिमी पाऊस झाला असून त्यानंतर चिखली (५१.२ मिमी), नांदुरा (४६.६ मिमी), जळगाव जामोद (४५.१ मिमी), संग्रामपूर (४४.३ मिमी) आणि बुलढाणा (४१.१ मिमी) तालुक्यांचा क्रमांक आहे. सर्वात कमी ८.६ मिमी पावसाची नोंद मलकापूर तालुक्यात झाली आहे.
महसूल मंडळांमध्ये जामोद मंडळात ७७.७ मिमी, मानसगाव ७६ मिमी, अमडापूर ७५.१ मिमी, शेगाव ७३.६ मिमी आणि जलंब ७२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. जमिनीत किमान सहा इंच ओलावा अथवा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीन, कपाशी, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांची पेरणी करावी, अन्यथा बियाण्यांचे अंकुरण कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ४ लाख ३५ हजार हेक्टरवर सोयाबीन, १ लाख २८ हजार हेक्टरवर कपाशी, ९९ हजार ५०० हेक्टरवर तूर, तसेच मका, मूग, उडीद आणि ज्वारीच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. समाधानकारक पावसामुळे आगामी काही दिवसांत जिल्हाभर खरीप पेरणीला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












