बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)माजी मंत्री तथा विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे हे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अद्याप भेटीस वेळ न मिळाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या माध्यमातून ही भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून, त्यातून डॉ. शिंगणे यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवांनाही उधाण आले आहे. मात्र, या सर्व चर्चांचे डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे.
डॉ. शिंगणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दोन महत्त्वाचे विषय मांडण्यासाठी भेट मागितल्याचे सांगितले. त्यामध्ये विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या बुटीबोरी येथील खत कारखान्याच्या उत्पादन परवान्याचे नूतनीकरण आणि बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच विविध शासकीय योजनांचे आर्थिक व्यवहार देण्याचा मुद्दा प्रामुख्याने आहे.
बुटीबोरी येथील खत कारखाना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून, कृषिदेव १८:१८:१८ मिश्रखताच्या उत्पादनासाठी शासनस्तरावरील निर्णय आवश्यक असल्याचे डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट केले. तसेच पुनरुज्जीवन योजनेनंतर बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सुधारली असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेने २३.५५ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. त्यामुळे नागपूर व वर्धा जिल्हा बँकांप्रमाणेच बुलढाणा जिल्हा बँकेलाही शासकीय व्यवहार मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबईतील त्यांच्या मुक्कामामुळे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तोंडावर असताना त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, डॉ. शिंगणे यांनी या अफवांना पूर्णविराम देत, “मी दोन दिवसांपासून मुंबईत आहे. मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे; मात्र अद्याप वेळ मिळालेली नाही. जिल्हा बँक आणि बुटीबोरी खत कारखान्याच्या परवान्यासंदर्भात चर्चा करायची आहे. भाजप प्रवेशाचा कुठलाही मुद्दा नाही,” असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांसोबतची ही भेट नेमकी कधी होते आणि त्यातून सहकार क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतात की राजकीय चर्चांना नवे वळण मिळते, याकडे आता बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे….














