Advertisement Advertisement

मोठी बातमी! “जिचा खून झाला तीच तरुणी जिवंत!”बुलढाणा एलसीबीच्या तपासावर मोठं प्रश्नचिन्ह; वडील-भाऊ निर्दोष असल्याचा दावा! राजुरा शिवारातील ‘मुंडके प्रकरणा’ला धक्कादायक कलाटणी, पोलिस दलात खळबळ

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): होय तुम्ही जी हेडलाईन्स वाचली ती अगदी खरी आहे कारण असा सीन सिनेमा मध्ये घडतो पण तो आता आपल्या बुलडाणा जिल्हा मध्ये झाला…जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडवून देणारा धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे. एखाद्या हॉरर चित्रपटाची कथा वाटावी असा हा प्रकार असून, जिचा खून झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता ती तरुणी चक्क जिवंत पोलिसांसमोर हजर झाली आहे. त्यामुळे बुलढाणा एलसीबीच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात एका तरुणीचे शीर आणि धड वेगवेगळ्या अवस्थेत आढळून आले होते. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास बुलढाणा एलसीबीकडे सोपविण्यात आला होता.

एलसीबीने तपास करत मृत तरुणीची ओळख शिवानी कळमेकर अशी पटवली होती. शिवानी बेपत्ता असल्याची तक्रार बऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर एलसीबीने शिवानीचे वडील आणि भावाला अटक करत त्यांनीच तिचा खून केल्याचा दावा केला होता.

विवाहित असलेल्या शिवानीचे चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून वडील आणि भावाने तिचा खून करून शीर धडापासून वेगळे केले व मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा दावा पोलिसांनी केला होता. या कथित “ऑनर किलिंग” प्रकरणाचा झटपट तपास केल्यामुळे त्यावेळी एलसीबीच्या पथकाचे कौतुकही झाले होते.

मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. शिवानी कळमेकर स्वतः तिच्या प्रियकरासोबत बऱ्हाणपूर पोलिसांसमोर हजर झाली असून “मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला चुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली,” असे तिने पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, बऱ्हाणपूर पोलिसांनी शिवानीला पुढील चौकशीसाठी जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर बुलढाणा एलसीबी आणि जळगाव जामोद पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, शिवानीचे काका नारायण कळमेकर यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “पोलीस आमच्या घरी आले आणि तुम्ही मुलीचा खून केल्याचा आरोप करत माझ्या भावाला आणि पुतण्याला अटक केली. पोलिसांनी त्यांना मारहाण करून जबरदस्तीने गुन्हा कबूल करून घेतला. माझा भाऊ आणि पुतण्या निर्दोष आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.शिवानी जिवंत असेल तर राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा?खरे खुनी कोण?नेमक्या कोणत्या पुराव्यांच्या आधारे वडील आणि भावाला अटक करण्यात आली?निर्दोषांना अटक केल्याबद्दल एलसीबीच्या तपास पथकावर कारवाई होणार का?

या प्रश्नांची उत्तरे आता बुलढाणा पोलिसांना द्यावी लागणार आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सध्या या गूढ आणि धक्कादायक प्रकरणाकडे लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!