मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज)सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतकरी सन्मान निधीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने गुरुवारी आणखी उग्र स्वरूप धारण केले. विधानभवनासमोरील आंदोलन, मंत्रालयाजवळील झाडावर चढून सुरू असलेला ठिय्या आणि त्यानंतर काही शेतकरी थेट मरीन ड्राईव्ह परिसरातील समुद्रात उतरल्याने मुंबईतील आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.
यापूर्वी आंदोलनकर्त्यांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करत सातबारे फेकले तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर मंत्रालयासमोरील झाडावर चढलेल्या काही कार्यकर्त्यांनी गळ्यात फास अडकवून ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली.
हे आंदोलन सुरू असतानाच काही शेतकरी मरीन ड्राईव्ह परिसरातील समुद्रात उतरल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत समुद्रात उतरलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढून ताब्यात घेतले.
सलग वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांमुळे मंत्रालय, विधानभवन आणि परिसरातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, सरकारकडून अद्याप मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय जाहीर झालेला नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिल्याने मुंबईतील या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.















