Advertisement Advertisement

१५ ऑगस्टपूर्वी साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय सुरू होणार?; मा.आ.डॉ. शशिकांत खेडेकरांची पाहणी, उर्वरित कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश….

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): साखरखेर्डा येथील नव्या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी ६ जुलै रोजी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी केली. पाहणीदरम्यान बांधकामातील काही त्रुटी निदर्शनास आल्याने त्या तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाची मागणी होती. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आमदार असताना हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडून रुग्णालयाला मंजुरी मिळवून दिली. त्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून इमारत बांधकामासाठी १४ कोटी ९५ लाख रुपये निधी मंजूर झाला. तसेच निवासी इमारतीसाठी ३ कोटी ५० लाख रुपये निधी मिळवून संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात आले.

रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी फायर फायटिंग प्रणालीची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करून ते कामही पूर्ण करण्यात आले. तसेच रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून २६ पदांच्या भरतीला शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.

रुग्णालय १५ ऑगस्टपूर्वी सुरू करण्याच्या दृष्टीने कामांना वेग देण्यात आला असून, उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन वाघ, कनिष्ठ अभियंता संतोष आढाव आणि अनिल बढे यांनी येत्या १५ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाबूराव मोरे, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर, साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर शुक्ल, दिलीप सोभागे, विठ्ठल गायकवाड, संदीप खिल्लारे आदी उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्षात सुरू होण्याच्या मार्गावर आल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!