Advertisement Advertisement

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत मोठा बदल! शिष्यवृत्ती घ्यायची तर ऐका! आता जुनं लॉगिन बंद, ‘महाडीबीटी 2.0’च वापरावं लागणार…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विविध शिष्यवृत्ती व शिक्षण सहाय्य योजनांच्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ६ जुलैपासून ‘महाडीबीटी 2.0’ प्रणालीद्वारे अर्ज नोंदणी सुरू केली असून, यापुढे जुन्या युजर आयडी व पासवर्डऐवजी आधार क्रमांकाच्या आधारे नवीन ‘महाआयडी’ तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या नव्या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रीकोत्तर शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांतील वसतिगृहातील व वसतिगृहाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी निर्वाहभत्ता अशा विविध योजनांसाठी नवीन तसेच नूतनीकरण अर्ज स्वीकारले जात आहेत.

विद्यार्थ्यांनी आधारवरील मोबाईल क्रमांक, ई-मेल, पत्ता आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, गुणपत्रिका आदी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात तयार ठेवून अर्ज करावा, असे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे. अर्ज प्रक्रियेसाठी आधार लॉगिन आवश्यक राहणार आहे.

महाविद्यालयांसाठीही नवे नियम….

‘महाडीबीटी 2.0’ प्रणालीमध्ये महाविद्यालयांसाठीही नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. लिपिक लॉगिन पूर्णपणे बंद करण्यात आले असून, आता केवळ प्राचार्यांच्या लॉगिनद्वारेच प्रणालीचा वापर करता येणार आहे. महाविद्यालयांनी नवीन डीफॉल्ट पासवर्ड वापरून संस्थेचे प्रोफाइल तातडीने अद्ययावत करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

उशीर झाल्यास प्राचार्य जबाबदार….

पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेत, यासाठी महाविद्यालयांनी अर्जांवर वेळेत कार्यवाही करणे आवश्यक आहे. अर्ज प्रलंबित राहिल्यामुळे एखादा पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा समाज कल्याण विभागाने दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!