नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संजय प्रल्हाद सुलतान (रा. अलमपूर) यांनी ७ जुलैच्या रात्री आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले. त्यांना तातडीने सामान्य रुग्णालय, खामगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
मृत संजय सुलतान यांच्याकडे सुमारे तीन एकर शेती होती. ग्रामसेवा सोसायटी, अलमपूरचे २०२१ पासूनचे ७१ हजार १५० रुपये कर्ज आणि ४३ हजार ६३३ रुपये व्याज अशी मोठी थकबाकी होती. सततची नापिकी, वाढत चाललेला आर्थिक ताण आणि कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांचे भाऊ राजेंद्र प्रल्हाद सुलतान यांनी सांगितले.
सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नसल्याची खंतही त्यांना होती, अशी माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी त्यांनी पत्नीला नांदुरा येथील एका समारंभात सोडून घरी परतल्यानंतर विष प्राशन केल्याचे सांगितले जात आहे.
संजय सुलतान हे अलमपूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच संपला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ असा परिवार आहे. ८ जुलै रोजी शवविच्छेदनानंतर अलमपूर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे अलमपूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.













