Advertisement Advertisement

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनास क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांचा पाठिंबा रखडलेला कोरोना भत्ता अदा करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)- शेलगाव जहागीर, पाटोदा ,एकलारा,दिवठाणा,भोरसा भोरसी,बोरगाव काकडे यासह चिखली तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसमोर कोरोना प्रोत्साहन भत्ता व थकीत मानधनासाठी सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्सचे दि१जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी आंदोलनात भेट देऊन आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा केली व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. “तीन दिवसांपासून महिला बसल्या आहेत मात्र मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद बुलढाणा यांनी टप्प्याटप्प्याने रखडलेला कोरोना भत्ता देण्यात यावा असे आदेश दिले आहेत.मात्र प्रशासनाकडून कोरोना भत्ता मिळणे संदर्भात कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे चिखली तालुक्यातील महिला आंदोलकांच्या तात्काळ मागण्या मान्य करा, अन्यथा क्रांतीकारी शेतकरी संघटना सुद्धा रस्त्यावर उतरेल असा इशारा सरनाईक यांनी यावेळी दिला.

अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा


आंदोलनस्थळावरूनच सरनाईक यांनी जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भारसाखळे, तहसीलदार गायकवाड व गटविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चा केली. आंदोलनातील मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती त्यांनी केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी “मागण्यांच्या अनुषंगाने लवकरच तोडगा काढू,” असे आश्वासन दिले आहे.

10 जुलै रोजी सीटूचे आंदोलन


मात्र, प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन’ (CITU) संघटनेच्या वतीनेही येत्या 10 जुलै रोजी पंचायत समिती, चिखली येथील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहेत मागण्या?
कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्सना शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता तात्काळ मिळावा, तसेच थकीत मानधन अदा करावे, या प्रमुख मागण्यांसाठी 1 जुलैपासून शेलगाव जहागीर येथे हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका चिखली तालुक्यातील आंदोलनकर्त्या महिलांनी घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!