देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील झुमडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षक दीपक भगवान गवई यांच्या बदलीविरोधात ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत शाळेला थेट कुलूप ठोकले आहे. “आमच्या हक्काचे शिक्षक आम्हाला परत द्या, अन्यथा मुलांचे दाखले (टीसी) काढून शाळाच बंद पाडू,” असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
झुमडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले दीपक भगवान गवई यांनी आपल्या प्रभावी अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली होती. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि शाळेच्या प्रगतीसाठी केलेल्या कामामुळे ते गावकऱ्यांमध्येही लोकप्रिय झाले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या त्यांच्या बदलीच्या आदेशानंतर गावात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
या निर्णयाविरोधात झुमडा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत १ जुलै रोजी पंचायत समिती देऊळगाव राजा येथील गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले. निवेदनात गवई यांची बदली तातडीने रद्द करून त्यांना पुन्हा झुमडा येथेच नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष विष्णू शिंदे यांनी सांगितले की, “दीपक गवई हे आमच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श शिक्षक आहेत. त्यांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. जोपर्यंत त्यांना पुन्हा शाळेत रुजू केले जात नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही.”
ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, मागणी मान्य न झाल्यास सर्व पालक आपल्या मुलांचे टीसी काढून घेतील आणि आंदोलन अधिक तीव्र करतील. त्यामुळे या प्रकरणात गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभाग काय निर्णय घेतात, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गवई यांच्या बदलीबाबत पुनर्विचार होतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.














