चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे यांच्या कारचा बुधवारी बेराळा फाट्याजवळ अपघात झाला. ते चिखलीहून येवता येथे जात असताना अचानक रस्त्यावर एक रोही (वन्य प्राणी) आडवा आल्याने कारचा अपघात झाला.
या घटनेत रोहीला कोणतीही इजा झाली नसून तो सुरक्षित जंगलाच्या दिशेने निघून गेला. तर कारचे नुकसान झाले असून संतोष काळे यांना किरकोळ मार लागला आहे. मोठी जीवितहानी टळली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. काही काळ रस्त्यावर गर्दी झाली होती. प्राथमिक माहितीनुसार संतोष काळे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
अचानक रस्त्यावर वन्य प्राणी आल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने कार्यकर्ते व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.













