खामगाव / जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : बुलढाणा जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या झाल्याच्या दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. १४ मेच्या रात्री व १५ मेच्या पहाटे घडलेल्या या घटनांमध्ये दोन पतींनी आपल्या पत्नींची निर्घृण हत्या केली. खामगाव येथे लोखंडी सब्बलने तर जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बु. येथे कुन्हाडीने वार करून पत्नीचा खून करण्यात आला. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी आरोपी पतींना अटक केली आहे.
खामगावात लोखंडी सब्बलने पत्नीची हत्या….
खामगाव शहरातील रेल्वे गेटलगतच्या झोपडपट्टी परिसरात राहणारे प्रकाश रुपलाल सोळंके (वय २५) व त्यांची पत्नी सविता प्रकाश सोळंके (वय २२) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. प्रकाशला दारूचे व्यसन असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याची माहिती समोर आली आहे.
१४ मेच्या मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात प्रकाश सोळंके याने लोखंडी सब्बलने सविता यांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घरातून आरडाओरड ऐकून शेजारी राहणाऱ्या पूजा रमेश सोळंके या घटनास्थळी गेल्या असता सविता या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. तर प्रकाश हा हातात सब्बल घेऊन मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी शेजारी राहणारे संजय शेनाजी मेढे यांना माहिती दिली.
संजय मेढे यांनी आरोपीला विचारणा केली असता “मी सविताला संपवलं, आता पोलीस स्टेशनला जातो,” असे सांगून तो तेथून निघून गेला. या प्रकरणी संजय मेढे यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश सोळंके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेंडवळ बु. येथे कुन्हाडीने वार करून पत्नीचा खून…
दुसरी घटना जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बु. येथे घडली. मायावती सहदेव भारसाकळे (वय ४६) यांच्यावर त्यांचे पती सहदेव शंकर भारसाकळे यांनी शुक्रवारी पहाटे सुमारे ४.१५ वाजता राहत्या घरी कुन्हाडीने हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मायावती यांना त्यांचा मुलगा मंगेश सहदेव भारसाकळे (वय २३) यांनी उपचारासाठी सामान्य रुग्णालय, खामगाव येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मंगेश भारसाकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये कायम अप क्रमांक ३१५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत आरोपी सहदेव भारसाकळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे तसेच पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे करीत आहेत.













