Advertisement Advertisement

चिखली शहरात भीषण पाणीटंचाई ! नागरिक पाण्यासाठी वणवण; टँकर सेवा आणि डिझेल टंचाईमुळे संकट अधिक गडद! नगरपालिका प्रशासन अपयशी…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भर उन्हाळ्यात चिखली शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. पालिकेचा नियमित पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एवढेच नव्हे तर अनेक भागांतील बोअरवेलनेही तळ गाठल्याने नागरिकांवर पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

गेल्या काही वर्षांत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असली तरी त्या तुलनेत पाणीपुरवठ्याचे कोणतेही ठोस नियोजन करण्यात आले नसल्याचे या गंभीर परिस्थितीतून स्पष्ट होत आहे. उन्हाळा सुरू होताच दरवर्षी निर्माण होणाऱ्या टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने यंदा परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

पालिका प्रशासनाकडून होणारा अधिकृत पाणीपुरवठा कोलमडल्याने नागरिकांनी खासगी टँकरकडे धाव घेतली आहे. मात्र आता शहरात टँकर मिळणेही कठीण बनले आहे. पाण्याचा खासगी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून टँकरचालक रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी धडपड करत आहेत. तरीही अनेकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, टँकर सेवा विस्कळीत होण्यामागे डिझेल टंचाई हेही मोठे कारण समोर आले आहे. शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यासाठी टँकरचालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे एका दिवसात होणाऱ्या फेऱ्यांची संख्या घटली असून पैसे मोजण्याची तयारी असतानाही ग्राहकांना वेळेवर पाणीपुरवठा करणे टँकरधारकांना शक्य होत नाही.

पाण्याअभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. स्वयंपाक, स्वच्छता, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत गरजांसाठीही नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अनेक कुटुंबांना कामधंदा बाजूला ठेवून दिवसभर केवळ पाण्याची व्यवस्था करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

शहरातील विविध भागांत शासकीय टँकर पोहोचत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. नगर परिषद प्रशासन या संकटावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. डिझेल समस्येमुळे टँकर सेवा विस्कळीत होत असताना प्रशासनाने टँकरसाठी विशेष इंधन पुरवठा अथवा राखीव व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक होते; मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाढती लोकसंख्या, अपुरी जलसाठा व्यवस्था आणि नियोजनाचा अभाव यामुळे भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!