चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नाच्या आनंदात निघालेल्या तिघा युवकांवर काळाने घाला घालत भीषण अपघात घडला. चिखली-जालना रोडवरील अंचरवाडी ते अंढेरा फाटा दरम्यानच्या धोकादायक वळणावर बुलेटचा अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली.
मृतकाचे नाव ओम संजय जामदार (वय २८, रा. आदर्श शाळेजवळ, चिखली) असे असून तो चिखली अर्बन बँकेचे अधिकारी संजय जामदार यांचा मुलगा होता. या अपघातात जय सुनील जामदार (वय २२) व अभिजीत प्रमोद भवर (वय २५) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही युवक बुलेटवरून लग्नासाठी जात असताना अंचरवाडी ते अंढेरा फाटा दरम्यानच्या वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. तत्काळ स्थानिकांच्या मदतीने त्यांना चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, ओम जामदार याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. ओमचा मृतदेह पाहताच आई-वडील, बहिण व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडत आक्रोश केला, त्यामुळे परिसरात शोककळा पसरली.
या घटनेची माहिती मिळताच चिखली अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष सतीश गुप्ता, अध्यक्ष संतोष गुप्ता, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख तसेच नगरसेवक सुरेंद्र ठाकूर यांनी रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
रात्री उशिरा चिखली येथील हिंदू स्मशानभूमीत ओम जामदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.












