चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज गावात शनिश्चरी अमावस्येच्या रात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. अघोरी कृत्य व जादूटोण्याच्या संशयातून एका कुटुंबाच्या घरासमोर मंत्रलेले लिंबू टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, ही संपूर्ण घटना घराबाहेरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण साळवे हे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते. सकाळी साधारण ६:२० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी साक्षी साळवे यांनी फोन करून घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक पूर्ण व एक कापलेले लिंबू पडले असल्याची माहिती दिली. यानंतर प्रविण साळवे तातडीने घरी परतले. त्यांनी पाहणी केली असता, हा प्रकार अंधश्रद्धा, जादूटोणा किंवा अघोरी कृत्याच्या हेतूने करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
घटनेनंतर साळवे यांनी घराबाहेरील CCTV फुटेज तपासले असता, गावातीलच एक संशयित इसम चोरट्याप्रमाणे घराजवळ येऊन काही क्षणांत लिंबू फेकून निघून जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. संबंधित व्यक्ती शेख गणी शेख दादु असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच त्याचा मुलगा शेख अजमत शेख गणी याचाही या प्रकरणात उल्लेख करण्यात आला आहे.
प्रकरणाची माहिती मिळताच गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नानाभाऊ ठेंग यांना बोलावण्यात आले. त्यांनी CCTV फुटेज पाहिल्यानंतर फुटेजमधील व्यक्तींची ओळख पटल्याचे सांगण्यात आले. शनिश्चरी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पूर्ववैमनस्यातून किंवा अघोरी प्रकाराच्या हेतूने हा प्रकार घडवून आणल्याची चर्चा गावात रंगली आहे.
या घटनेमुळे साळवे कुटुंब मानसिक तणावाखाली आले असून, प्रविण साळवे यांनी त्यांचे मामा दादाराव श्रीराम पडघान यांच्यासह चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दिली. पोलिसांनी स्टेशन डायरी क्रमांक २२/२६ अन्वये नोंद घेत भारतीय न्याय संहिता तसेच जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.














