Advertisement Advertisement

बुलढाणा जिल्ह्यात खळबळ! २१ वर्षीय तरुणी सह तीन महिला बेपत्ता! सोनाळा, बिबी आणि मलकापूर परिसरातील घटनांनी चिंता वाढली…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही तासांत महिला आणि तरुणी बेपत्ता होण्याच्या तीन धक्कादायक घटना समोर आल्या असून, यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सोनाळा, बिबी आणि मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतून या तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही महिलांनी कोणालाही काहीही न सांगता घर सोडल्याचे समोर आले आहे. यात एका २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीसह दोन विवाहित महिलांचा समावेश आहे.

मध्यरात्री घरातून तरुणी गायब….

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील नेहा संतोष राऊत (वय २१) ही उच्चशिक्षित तरुणी ३ मे रोजी मध्यरात्री गूढरीत्या बेपत्ता झाली. अर्जदार गोपाळ रामकृष्ण राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री कुटुंबीय झोपलेले असताना आणि घरातील पुरुष मंडळी शेतात पाणी देण्यासाठी गेलेली असताना ही घटना घडली. पहाटे सुमारे १.३० वाजता नेहाच्या आजीला घराचा दरवाजा उघडा दिसला. शोध घेतला असता नेहा घरात नसल्याचे समोर आले. नेहाचा रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट असून तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता.

बिबीतील विवाहिता घरातून निघाली….

बिबी येथील प्रियंका अनिल मान्टे (वय २३) ही विवाहिता ४ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. याप्रकरणी पती अनिल सुभाष मान्टे यांनी बिबी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. प्रियंकाने पिवळसर रंगाचा टॉप, काळी लेगीज आणि चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेला होता. तिच्या पाठीवर बॅगही असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार रविराज चव्हाण करत आहेत.

घरगुती वादानंतर महिला बेपत्ता….

मलकापूर शहरातील कुंड खुर्द येथील शारदा संजय चांदणे (वय ३३) या ३ मे रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास रागाच्या भरात घर सोडून गेल्या. नणंद आणि मोठ्या बहिणीच्या वादातून पती-पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. पती कामावर गेल्यानंतर शारदा या “मलकापूरला जाते” असे सांगून घरातून निघाल्या; मात्र त्या अद्याप परतलेल्या नाहीत. त्यांचा रंग सावळा असून त्यांनी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार सचिन पाटील करत आहेत.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर….

एकाच दिवशी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतून तीन महिला बेपत्ता झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा आणि वाढत्या बेपत्ता प्रकरणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणांचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून, संबंधित महिलांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!