सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचे विभाजन करून साखरखेर्डा येथे अप्पर तहसील निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या प्रस्तावावर नागरिक, संस्था व संबंधितांनी पुढील १५ दिवसांच्या आत हरकती किंवा सूचना सादर कराव्यात, असे आवाहन प्रांत अधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
सिंदखेडराजा तहसील अंतर्गत सध्या ११४ गावांचा प्रशासकीय कारभार चालतो. भौगोलिकदृष्ट्या तालुक्याचे क्षेत्र मोठे असल्याने स्वतंत्र साखरखेर्डा तालुका निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, राज्य शासनाकडे नवीन तालुके निर्माण करण्याचे धोरण नसल्याने ही मागणी प्रलंबित राहिली आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यायी उपाय म्हणून साखरखेर्डा येथे अप्पर तहसील स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे महसूल प्रशासन अधिक प्रभावी व नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
सिंदखेडराजा तहसीलमध्ये एकूण सात महसूल मंडळे असून, नव्या साखरखेर्डा अप्पर तहसीलमध्ये साखरखेर्डा आणि शेंदुर्जन या दोन महसूल मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. या संदर्भातील वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. आता प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करून हरकती व सूचना मागविल्याने साखरखेर्डा अप्पर तहसील निर्मितीवर शिक्कामोर्तब होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
















