बुलढाणा (जिमाका: बुलढाणा कव्हरेज न्यूज) : खरीप हंगाम २०२६ सुरू होत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीबाबत कोणतीही घाई करू नये, असे स्पष्ट आवाहन कृषी विभागाने केले आहे. जमिनीत किमान ६ इंच ओलावा किंवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशीसह खरीप पिकांची पेरणी करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, पुरेसा ओलावा नसताना पेरणी केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे बियाण्यांचे अंकुरण कमी होण्याची किंवा अंकुर जळण्याची शक्यता असते. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन अतिरिक्त खर्च, श्रम आणि वेळ वाया जाण्याचा धोका निर्माण होतो.
काही भागांत शेतकरी धूळपेरणी करत असल्याचे निदर्शनास आले असून, अशी घाई टाळण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. जिल्ह्यात सध्या समाधानकारक पावसाची सुरुवात झाली असली तरी पावसाची स्थिती आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊनच पेरणीचे नियोजन करावे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
















