Advertisement Advertisement

मीटर फॉल्टी, बिल मात्र तगडं! बुलडाणा जिल्ह्यातील काही महावितरणचा कारभार पाहून ग्राहकांच्या डोक्याला ताप!

बोरखेड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वीज वितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये फॉल्टी मीटरच्या नावाखाली वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष वीज वापर कमी असतानाही तीनपटपर्यंत अधिक युनिटची आकारणी होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. काही ग्राहकांच्या घरात तर महिन्याला तब्बल साडेतीन ते चार हजार रुपयांपर्यंत वीज बिले येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अनेक घरगुती वीज मीटरच्या डिस्प्लेमध्ये बिघाड झाल्याने प्रत्यक्ष वापरलेल्या युनिटची नोंद दिसत नाही. त्यामुळे वीज बिलावर युनिटऐवजी ‘फॉल्टी’ असा उल्लेख येत आहे. मात्र, संबंधित ग्राहकांच्या घरातील वीज उपकरणे, त्यांचा वापर आणि प्रत्यक्ष वीज वापर यांची योग्य पडताळणी न करताच अंदाजे वाढीव युनिट आकारले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

घरात मोजकीच वीज उपकरणे असताना हजारो रुपयांचे बिल हातात पडत असल्याने ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. एकीकडे परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट, दुसरीकडे शेतकरी आणि शेतमजुरांची आर्थिक ओढाताण, अशा परिस्थितीत महावितरणच्या वाढीव वीज बिलांचा अतिरिक्त भार सर्वसामान्यांच्या माथी मारला जात असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

मीटर तपासा, प्रत्यक्ष वापरानुसारच बिल द्या! फॉल्टी मीटरच्या नावाखाली होणारी कथित अतिरिक्त आकारणी तातडीने थांबवावी, बिघाड झालेल्या मीटरची तपासणी करून ते बदलून द्यावेत आणि ग्राहकांकडून प्रत्यक्ष वीज वापरानुसारच बिल आकारावे, अशी जोरदार मागणी परिसरातील वीज ग्राहकांनी केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात महावितरणचे अधिकारी जयसिंग पवार यांनी सांगितले की, फॉल्टी मीटरमुळे जास्त युनिटचे बिल येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील. आता या तक्रारींची दखल घेऊन महावितरण ग्राहकांना दिलासा देणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!