Advertisement Advertisement

देऊळगाव घुबेत सोयाबीनची सुडी पेटवली! आधी दुष्काळानं रडवलं, आता आगीने झोडपलं! कष्टानं पिकवलेली सोयाबीनची गंजी राख; वृद्ध मायचा हंबरडा!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आधीच दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकटात आता शेतातील सोयाबीनच्या गंजींना लागणाऱ्या आगींची भर पडत आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर येथे एका वृद्ध महिला शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागून सुमारे ४२ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना २८ ऑक्टोबरच्या रात्री घडली. कष्टाने पिकवलेलं सोयाबीन डोळ्यादेखत राख झाल्याने पुष्पाबाई फकीरबा कर्हाडे (वय ६५) यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे.

पुष्पाबाई कऱ्हाडे यांचे देऊळगाव धनगर शिवारात सर्वे गट क्रमांक ४ मध्ये शेत आहे. त्यांनी ३० आर क्षेत्रातील सोयाबीन काढून त्याची गंजी शेतात लावून ठेवली होती. मात्र, २८ ऑक्टोबरच्या रात्री अचानक या गंजीला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने जळालेल्या गंजीकडे पाहून पुष्पाबाई यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचीही मने हेलावून गेली.

यंदा पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात कष्टाने पिकवलेले आणि काढणीनंतर शेतात साठवून ठेवलेले सोयाबीनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. शेतीवरच उदरनिर्वाह असलेल्या ६५ वर्षीय अल्पभूधारक महिला शेतकऱ्यापुढे आता झालेलं नुकसान भरून काढायचं कसं, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

दरम्यान, चिखली तालुक्यात सोयाबीनच्या गंजीला आग लागण्याची ही सहावी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे दुष्काळाने उत्पादन घटवले, तर दुसरीकडे आगीमुळे हातात आलेले पीकही हिरावले जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त पुष्पाबाई कर्हाडे यांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!