बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळघाट रोडवर झालेल्या भीषण अपघाताने शिरसाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत १३ वर्षीय प्रतीक्षा विवेक शिरसाट हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना १ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाडळी गावावर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विवेक संतोष शिरसाट (वय ४०), पत्नी किरण विवेक शिरसाट (वय ३५) आणि मुलगी प्रतीक्षा (वय १३), हे तिघेही अल्टो कारने (क्रमांक MH12AN9666) बुलढाण्याहून आपल्या पाडळी गावाकडे जात होते. दरम्यान, देऊळघाट रोडवर समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (क्रमांक MH30AA7498) कारची त्यांच्या वाहनाला जोरदार समोरासमोर धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की, या अपघातात प्रतीक्षा हिला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे आई-वडील विवेक आणि किरण शिरसाट गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमी दाम्पत्याला तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अवघ्या १३ वर्षांच्या प्रतीक्षाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पाडळी गावातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, स्विफ्ट डिझायर चालकासंदर्भातील सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.













