जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावात देवाच्या आरतीसाठी जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली ६५ वर्षीय महिला तब्बल १५ दिवस उलटूनही घरी परतली नसल्याची घटना पिंपळगाव काळे येथे समोर आली आहे. शांताबाई भगवान तायडे असे बेपत्ता महिलेचे नाव असून, पत्नीचा शोध घेऊन थकलेल्या ७० वर्षीय पतीने अखेर जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव काळे येथील भगवान लक्ष्मण तायडे (वय ७०) हे शेती व्यवसाय करतात. त्यांची पत्नी शांताबाई तायडे (वय ६५) या १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावात देवाच्या आरतीसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत. सुरुवातीला त्या गावातच कुठेतरी असतील, असे पतीला वाटले; पण दिवस उलटत गेल्याने त्यांची चिंता वाढली.
गाव पालथे घातले, नातेवाईकांकडे चकरा मारल्या; पण पत्नीचा पत्ता लागेना!
भगवान तायडे यांनी पत्नीचा शोध घेण्यासाठी गावातील कानाकोपरा पिंजून काढला. गावातील नागरिकांसह नातेवाइकांकडेही चौकशी केली. पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. सर्वत्र शोध घेऊनही शांताबाई यांचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
बेपत्ता शांताबाई यांचे वय ६५ वर्षे असून, रंग गोरा, उंची अंदाजे पाच फूट चार इंच आहे. त्यांनी घरातून बाहेर पडताना हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यांचे केस लांब आहेत. या वर्णनाची महिला कुणाला आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जळगाव जामोद पोलिसांनी तक्रारीच्या आधारे बेपत्ता महिलेचा शोध सुरू केला आहे. आरतीसाठी घराबाहेर पडलेली पत्नी नेमकी कुठे गेली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. १५ दिवसांपासून पत्नीची वाट पाहणाऱ्या वृद्ध पतीला आता तिच्या सुखरूप परतण्याची आस लागली आहे.













