बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा गंभीर परिणाम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना पुढील उपचारांसाठी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. शरीरात तीव्र स्वरूपाचा संसर्ग (इन्फेक्शन) वाढल्याबरोबरच रक्तातील साखरेची पातळी अद्याप सामान्य झालेली नसल्याने आणि अनेक वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाल्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, सोयाबीन व कापूस उत्पादकांना आर्थिक मदत, शेतमालाला हमीभाव आणि इतर शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या प्रत्येक दिवसागणिक त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत गेला. रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत घसरल्याने डॉक्टरांनी वारंवार इशारा दिला होता. याशिवाय किडनीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती,मात्र अन्नाचा कणही घेणार नसल्याचा निर्धार तुपकर यांनी केल्याने प्रकृती आणखी खालावत गेली.
दरम्यान, राज्यभरातील शेतकऱ्यांनी तुपकर यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा दर्शविला. अनेक ठिकाणी रास्तारोको, बंद, निषेध मोर्चे आणि आंदोलनांच्या माध्यमातून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना राज्य सरकारने मध्यस्थीची भूमिका घेतली. मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी आंदोलनस्थळी भेट देऊन तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि सरकारच्या वतीने मागण्यांवर सकारात्मक निर्णयासाठी चार दिवसांचा अवधी मागितला.
शेतकरी बांधवांच्या भावना आणि सरकारच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पाच दिवसांच्या अन्नत्यागामुळे शरीरात निर्माण झालेल्या गंभीर वैद्यकीय गुंतागुंतींमुळे त्यांची प्रकृती अपेक्षितरीत्या सुधारली नाही. त्यामुळे उच्चस्तरीय उपचारांसाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.
वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच दिवसांच्या अन्नत्यागामुळे तुपकर यांच्या शरीरातील साखरेची पातळी अजूनही सामान्य झालेली नाही. त्यांच्या शरीरात ‘किटोन’ चे प्रमाण लक्षणीय वाढले असून त्यामुळे ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’ या गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याची चिन्हे दिसून येत असून शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवरही ताण पडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वाढलेल्या इन्फेक्शनमुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनली असून वैद्यकीय तज्ज्ञ त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
सध्या तुपकर यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, सरकारने मागितलेल्या चार दिवसांच्या मुदतीत शेतकरी प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जातो की नाही, याकडे राज्यभरातील शेतकरी आणि तुपकर समर्थकांचे लक्ष लागले आहे. आंदोलन स्थगित झाले असले तरी शेतकरी प्रश्नांवरील संघर्ष अद्याप संपलेला नसल्याची भावना तुपकर समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.
















