Advertisement Advertisement

पुन्हा पुण्यात दिसली तर मर्डर करून टाकू! लग्नात ५० लाख खर्च करूनही विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नासाठी तब्बल ५० लाख रुपये खर्च करून, पतीला दोन लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि विविध चैनीच्या वस्तू देऊनही विवाहितेचा सोने व पैशांसाठी छळ केल्याचा गंभीर प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. “पुन्हा पुण्यात दिसली तर मर्डर करून टाकू,” अशी धमकी दिल्याचा आरोपही विवाहितेने केला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बुलढाणा तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय विवाहिता पुण्यातील एका आयटी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तिचा विवाह मे २०२२ मध्ये पुण्यातील एका तरुणासोबत चिखली येथे मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नावेळी माहेरच्यांनी मोठा खर्च केला. पतीला दोन लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी तसेच विविध चैनीच्या वस्तू दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून सतत टोमणे मारणे, अपमान करणे तसेच पैशांची आणि सोन्याची मागणी करणे सुरू झाल्याचा आरोप विवाहितेने केला आहे.

‘तुझ्याशी लग्न करून पस्तावलो’ म्हणत मानसिक त्रास….

तक्रारीनुसार, “आम्हाला ५० तोळे सोने देणारे आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न करून देणारे स्थळ आले होते; तुझ्याशी लग्न करून पस्तावलो,” असे बोलून विवाहितेला मानसिक त्रास देण्यात आला. फोटोग्राफरचे दोन लाख रुपये, घरातील फर्निचरसाठी पैसे तसेच माहेराहून २५ ते ५० तोळे सोने आणण्याची मागणी करण्यात आल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

पतीसाठी स्वतःच्या नावावर तब्बल सात लाख रुपयांचे कर्ज काढून दिल्यानंतरही सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास थांबला नाही, असा दावा विवाहितेने केला आहे.

तीन महिन्यांची गरोदर असताना घराबाहेर काढल्याचा आरोप….

विवाहिता तीन महिन्यांची गरोदर असताना तिला घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलाचा जन्म झाला. मुलगा तीन महिन्यांचा झाल्यानंतरही सासरच्या मंडळींपैकी कोणीही त्याला पाहण्यासाठी आले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

जुलै महिन्यात विवाहिता आपल्या मुलाला घेऊन पुण्यातील सासरी गेली असता, सासूने मारहाण करून तिला घराबाहेर काढल्याचा आरोप तिने केला आहे. यावेळी तिच्या आई आणि भावालाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपास सुरू….

विवाहितेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!