खामगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रोहणा शिवारात शेताच्या तार कंपाउंडमध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून ३० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे रोहणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत महिलेचे नाव दुर्गाबाई सोमनाथ टेळे (वय अंदाजे ३० वर्षे, रा. रोहणा, ता. खामगाव) असे आहे. दुर्गाबाई या आपल्या कुटुंबासह मेंढीपालन व्यवसाय करत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, टेळे कुटुंबाने रोहणा शिवारातील गट क्रमांक २६२ मधील सुमारे तीन एकर शेतजमिनीत मेंढ्यांसाठी तात्पुरते निवारे उभारले होते. या शेतात कापसाचे पीक घेण्यात आले होते. पिकाचे जंगली प्राणी व वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती तार कंपाउंड करण्यात आले होते. या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आल्याची माहिती आहे.
२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी दुर्गाबाई शेतात निंदणीचे काम करत होत्या. त्यावेळी धुऱ्याजवळील विद्युत प्रवाह असलेल्या तार कंपाउंडचा त्यांना जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने त्या तारेला चिकटल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबादास बुधा टेळे (वय ४६ वर्षे, रा. लाखनवाडा, ता. खामगाव) यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दुर्गाबाई या तार कंपाउंडला चिकटलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आल्या.
या घटनेची माहिती २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३५ वाजता खामगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी फिर्यादीच्या अहवालावरून कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग) केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास बीट सफौ भगवान काळबागे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. घटनेचा नेमका प्रकार आणि विद्युत प्रवाह सोडण्यामागील परिस्थिती याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
शेतातील विद्युत तारांबाबत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती विद्युत प्रवाह असलेल्या तारांचा वापर केला जातो. मात्र, अशा तारांमुळे शेतकरी, मजूर किंवा परिसरातील नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. रोहणा येथील या घटनेमुळे शेतातील विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दुर्गाबाई यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे टेळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रोहणा गावात शोककळा पसरली आहे.













