मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वाकोडी येथे गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दीड वाजता घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील पोत लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. चोरट्याने चाकूचा धाक दाखवून पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने चोरट्याचा डाव फसला. तरुण मदतीला धावून येत असल्याचे दिसताच चोरट्याने पोत घरातच सोडून तेथून पळ काढला.
वाकोडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काजळे यांचे मोठे बंधू प्रकाश सदाशिव काजळे यांच्या घरी ही घटना घडली. प्रकाश काजळे यांच्या पत्नी कावेराबाई काजळे (वय ६०) या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत झोपल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्यातील पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला. अचानक जाग आल्यानंतर कावेराबाईंच्या समोर चाकू घेऊन उभ्या असलेल्या चोरट्याने त्यांना धाक दाखविला.
मात्र, प्रसंगावधान राखत कावेराबाईंनी घाबरून न जाता मुलाला आवाज देत मोठ्याने आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून घराशेजारी झाडाखाली बसलेले काही तरुण तातडीने वरच्या मजल्याकडे धावले. तरुण येत असल्याचे लक्षात येताच चोरट्याने तेथून पळ काढला. या गडबडीत त्याच्या हातातील पोत घरातच सुटून पडल्याचे सांगण्यात येते. तरुणांनी चोरट्याचा परिसरात शोध घेतला; मात्र तो हाती लागला नाही.
प्राथमिक माहितीनुसार, चोरटा हा घराच्या पाठीमागील शेतशिवाराच्या दिशेने आला असावा. बाजूच्या एका घरातून वरच्या मजल्यावरील खोलीत प्रवेश केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही घटना रात्रीच्या अंधारात नव्हे, तर भरदुपारी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरात महिला एकटी असल्याची संधी साधून चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आमदार चैनसुख संचेती यांनीही काजळे यांच्या घरी भेट देत कुटुंबीयांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भरदुपारी घरात घुसून लुटीचा प्रयत्न झाल्याने गावातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. शेतशिवाराकडून होणारी ये-जा, घरांची रचना आणि दिवसा घरात महिला व ज्येष्ठ नागरिक एकटे असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.












