डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या एका गावात दोन अल्पवयीन गरोदर मातांची नोंद झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. यातील एका अल्पवयीन मातेची प्रसूती झाली; मात्र उपचारादरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या अल्पवयीन मातेची प्रसूती अद्याप बाकी आहे. या प्रकाराची माहिती आरोग्य विभागाने ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्यानंतर ग्रामपंचायत सचिवांच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणाऱ्या व्यक्तीसह लग्न लावून देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील नोंदणीकृत गरोदर मातांच्या वयाची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. गरोदर मातेची नोंदणी करताना आधार कार्डासोबत शाळेचा दाखला किंवा उपलब्ध अधिकृत कागदपत्रांवरून वय तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अल्पवयीन गरोदर माता आढळल्यास संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिका प्रशासनाला माहिती देऊन बालविवाहाच्या अनुषंगाने आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यास कळविण्यात येत आहे.
बालविवाह करणे, त्याला संमती देणे किंवा बालविवाह लावून देणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, बालविवाह झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यास तिच्या आरोग्यासंदर्भात गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आरोग्य विभागाकडून संबंधित गर्भवतीला ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ अर्थात अति जोखमीची गरोदर माता म्हणून विशेष देखरेखीखाली ठेवले जाते. वेळोवेळी तपासणी, आवश्यक उपचार आणि मार्गदर्शन केले जाते.
आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर….
बुलढाणा जिल्ह्यात शहर तसेच ग्रामीण भागात दरवर्षी ४५ हजारांपेक्षा अधिक गरोदर मातांची नोंदणी होते. या नोंदणीदरम्यान अल्पवयीन गरोदर माता आढळल्यास तिच्यावर उपचार नाकारले जात नाहीत. उलट, तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते आणि बालविवाह झाल्याची माहिती ग्रामपंचायत स्तरावरील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असलेल्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिली जाते. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून कायदेशीर कारवाई केली जाते.
देऊळगाव साखरशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अल्पवयीन गरोदर मातांचे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने आता अशा प्रकरणांचा शोध घेण्यावर भर दिला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर गरोदर मातांच्या वयाची कागदपत्रांद्वारे पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अल्पवयीन गरोदर माता आढळल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेला कळवून तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अल्पवयीन गरोदर मातेची विशेष काळजी घेणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजीत मंडाले यांनी दिली.













