Advertisement Advertisement

गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाइटला बंदी; जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर बीम लाइट आणि लेझर बीम लाइटचा वापर करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनांवर, मिरवणूक मार्गावर तसेच वाद्यांच्या व्यवस्थेजवळ अशा तीव्र प्रकाशझोतांचा वापर करता येणार नाही. गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वाहनांवर तसेच वाद्यांच्या ठिकाणी मोठ्या क्षमतेचे बीम आणि लेझर लाइट लावण्याचा प्रकार आढळतो. मात्र, या तीव्र प्रकाशाचा थेट झोत डोळ्यांवर पडल्यास मिरवणुकीतील भक्त, सहभागी नागरिक तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रखर प्रकाशझोत अचानक वाहनचालकांच्या डोळ्यांवर पडल्यास त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. काही परिस्थितीत अशा तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांना कायमस्वरूपी इजाही होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश….

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अंतर्गत सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य किंवा शांततेला धोका निर्माण करणाऱ्या कृतींवर तातडीने निर्बंध घालण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार विसर्जन वाहन, मिरवणूक मार्ग आणि वाद्यांच्या ठिकाणी प्रखर बीम व लेझर प्रकाशाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षकांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. सर्व गणेश मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी या आदेशाचे पालन करून विसर्जन मिरवणुका सुरक्षितपणे पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!