चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वैरागड येथे गुरुवारी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याने एकच खळबळ उडाली. गव्हाणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळताच वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आरएफओ वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. काही वेळातच बिबट्या पिंजऱ्यात शिरल्याने वनविभागाच्या पथकासह उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर पिंजरा विहिरीतून वर ओढण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र विहिरीच्या कडेला असलेल्या लोखंडी टोकामध्ये पिंजरा अडकल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
याच दरम्यान पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्याची संधी मिळताच बिबट्याने क्षणाचाही विलंब न करता जोरदार झेप घेतली आणि थेट शेताच्या दिशेने धूम ठोकली. बिबट्या अचानक पळून गेल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ मोठी धावपळ उडाली. “पळा… पळा… बिबट्या सुटला!” अशा आरोळ्यांनी परिसर दणाणून गेला.
या रेस्क्यू मोहिमेत आरएफओ वाकोडे, वनपाल नेव्हरे, वनरक्षक पैठणे मॅडम यांच्यासह रेस्क्यू टीम सहभागी झाली होती. गावातील सामाजिक कार्यकर्ते मुकेश भंडारे यांनीही घटनास्थळी मदत केली. बिबट्या विहिरीतून बाहेर पडून शेताच्या दिशेने पसार झाल्याने तो परिसरातच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी शेतात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बिबट्याच्या हालचालींवर वनविभागाकडून लक्ष ठेवले जात आहे.
















