देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील संजयनगर परिसरातून ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचे सांगून घराबाहेर पडलेली २९ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. १४ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घरातून बाहेर पडलेली ही महिला बराच वेळ उलटूनही घरी परतली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच शहर आणि परिसरात शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला घराबाहेर पडताना मुलांकडे लक्ष ठेवण्यास सांगून ब्युटी पार्लरमध्ये जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांकडेही चौकशी करण्यात आली तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेण्यात आला; मात्र महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
दरम्यान, महिलेच्या पतीने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने संबंधित महिलेला पळवून नेले असावे, असा संशय पतीने तक्रारीत व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलिसांकडून सुरू असून बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही केली जात आहे.














