Advertisement Advertisement

‘बाप रस्त्यावर उतरण्याआधीच पोरगं भारी ठरलं!’धाडच्या दहीहंडीत गायकवाडांचा आमदार महालेंना थेट इशारा…! ‘बाप तो बाप रहेगा’वरून राजकारणाचा पारा चांगलाच चढला…

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असून, आमदार श्वेता महाले आणि शिवसेनेचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील शाब्दिक संघर्षाला धाडच्या दहीहंडी उत्सवात आणखी धार आली. बुलढाण्यातील एका रॅलीदरम्यान ‘बाप तो बाप रहेगा…’ असा तोरा मिरवला गेला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांनी, ‘बाप रस्त्यावर उतरण्याआधी माझा पोरगाच भारी ठरला’, असे म्हणत येणारा काळच काय ते ठरवेल, असा अप्रत्यक्ष इशारा दिला.

राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने धाड येथे ८ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो महिला-पुरुषांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या उत्सवातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. आमदार गायकवाड यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणातून कार्यकर्ते आणि उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.

यावेळी आमदार गायकवाड यांनी नाव न घेता आमदार श्वेता महाले आणि विद्याधर महाले यांच्यावर जोरदार टीका केली. ‘एका लेकराला चॅलेंज देण्यासाठी बुलढाण्यात कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात माझा सहभाग शून्य होता. माझा काही संबंध नव्हता. आजच्या धाडच्या कार्यक्रमातही माझा सहभाग शून्य आहे,’ असे ते म्हणाले. पुढे त्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी लोकांना पैसे देऊन आणल्याचा आरोप केला. ‘आम्हाला भाड्याच्या माणसांची गरज नाही. लोकांनी मनापासून शुभेच्छा द्यायला पाहिजेत,’ असा टोला त्यांनी लगावला.

बुलढाण्यातील कार्यक्रमात आपल्यावर वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरून टीका झाल्याचे सांगत गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर भाष्य केले. ‘शेतकऱ्यांना विचारा वीज कशी खंडित होते. अर्धा-अर्धा तास वीज टिकत नाही. दिवसातून किती वेळा वीज जाते,’ असे ते म्हणाले. तसेच, आपल्याला विरोध करायचा असता तर धाड नाक्यावर आपली फौज उभी केली असती आणि विरोधकांना मागच्या मागे पळावे लागले असते, असा दावाही त्यांनी केला.

कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. बुलढाण्यातील कार्यक्रमादरम्यान वाहतूक व्यवस्थेबाबत पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप करत रुग्णवाहिकेलाही मार्ग न मिळाल्याचा दावा त्यांनी केला. ‘पोलिसांनी आज खरे प्रेम पाहिले. त्या दिवशी चौकाचौकात पोलिसांना ताटकळत उभे करण्यात आले,’ असे ते म्हणाले. बुलढाणा आणि चिखलीतही ‘ओरिजनल भाजप’ सोबत नव्हती, असा दावाही त्यांनी केला.

‘मी सात हजार कोटी रुपये आणले. मुख्यमंत्री तुमच्याकडे आहे, तर धाडसाठी त्याचा फायदा करा. आम्ही पक्ष वाढवतोय, आम्हाला वैयक्तिक देणे-घेणे नाही,’ असे सांगत पदाचा वापर गोरगरिबांच्या मुलांना तडीपार करण्यासाठी किंवा पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी करू नये, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असून शेतकरी संकटात आहे, मुलांचे शिक्षण आणि मुलींच्या लग्नाची चिंता आहे; मात्र या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.

‘बाप तो बाप होता है’वरून थेट पलटवार…

‘बाप तो बाप होता है…’ या वक्तव्याचा संदर्भ देत आमदार गायकवाड यांनी स्त्रीचा सन्मान करण्याचे आवाहन केले. ‘ईश्वराने स्त्री-पुरुष दोनच जाती बनवल्या. स्त्रीमध्ये माता, देवी, जगदंबा, दुर्गा आणि चामुंडेचे रूप पाहतो. मात्र महिलांचा अपमान करणारी भाषा वापरली जाऊ नये,’ असे ते म्हणाले. आगामी काळात ‘बापच नाही, पुढे काय आहे तेही दाखवून देऊ,’ असा इशाराही त्यांनी दिला.

‘होय, मी कचराच!’ म्हणत गायकवाडांचा पलटवार…

आमदार श्वेता महाले यांनी विद्याधर महाले यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात ‘बुलढाण्याचा कचरा चिखलीत आला’ अशी टीका केल्याचा संदर्भ देत गायकवाड यांनी त्यावरही जोरदार पलटवार केला. ‘होय, मी कचराच आहे. शिवरायांचा मावळा म्हणून कचरा आहे. उपमुख्यमंत्र्यांचा शिलेदार म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील दमदार आमदार म्हणून कचरा आहे,’ असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांचा आत्मनिर्भर आमदार म्हणूनही आपण ‘कचरा’ असल्याचे सांगत त्यांनी उपरोधिक प्रत्युत्तर दिले.

‘तरुणाईला हात लावाल तर जळून जाल…

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना गायकवाड यांनी, ‘आम्ही केबिनमध्ये बसून धमकावत नाही. लोकांची प्रचंड शक्ती आहे. या शक्तीला चॅलेंज करू नका,’ असे सांगितले. तरुणाईला हात लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांपेक्षा रोजगार, नोकऱ्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम देण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला बुलढाणा नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, युवा नेते मृत्यूंजय गायकवाड, धर्मवीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रिजवान सौदागर, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!