चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आ. श्वेता महाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिवत पूजन व आरती करून राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे प्रार्थना केली.
गणरायाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. श्वेता महाले आणि विद्याधर महाले यांच्याशी चिखली विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थितीबाबत चर्चा केली. विशेषतः पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा यावेळी प्राधान्याने मांडण्यात आला.
पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट….
चिखली मतदारसंघात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी पिकांची अवस्था, पाणीटंचाई तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत आ. श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक शासकीय मदत मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी….
चिखली विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आ. श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
आ. महाले यांच्या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दखल घेतली असून, चिखली मतदारसंघातील परिस्थितीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून आता कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे लक्ष लागले आहे.
















