लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पिकांची अवस्था बिकट झाली असून, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी करावी आणि १०० टक्के पीकविमा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी लोणार तहसील कार्यालयासमोर डफडे वाजवत आंदोलन करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
मागील एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, ज्वारी यांसह विविध पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा दावा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे परिस्थितीची तातडीने पाहणी करून बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
वाळलेले सोयाबीन हातात घेऊन डफडे वाजवत घोषणाबाजी….
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी हातात वाळलेले सोयाबीन घेऊन डफडे वाजवत शासनाच्या धोरणांचा निषेध केला. ‘सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा मिळालाच पाहिजे’, अशा घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. मागील वर्षाचा तसेच चालू वर्षाचा १०० टक्के पीकविमा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास रास्ता रोको….
शेतकऱ्यांच्या मागण्यांची ३० सप्टेंबरपर्यंत दखल घेऊन ठोस निर्णय न झाल्यास बैलजोड्या, शेतीची अवजारे आणि अन्य साहित्य रस्त्यावर आणून बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सहदेव लाड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















