मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव माळी फाट्यानजीक ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन गंभीर जखमी झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. निशीन प्रकाश कापरे (वय २३, रा. देऊळगाव माळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, निशीन कापरे हा कामानिमित्त दुचाकीने मेहकरकडे जात होता. नागझरी खुर्दजवळील देऊळगाव माळी फाट्यानजीक त्याच्या दुचाकीला एमएच-१६ एव्हाय-८१९९ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात निशीन रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मेहकर येथील गाभणे रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.
अपघातप्रवण फाट्यावर उपाययोजना कधी?
नागझरी खुर्द-देऊळगाव माळी फाट्यावर यापूर्वीही लहान-मोठे अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रस्ते सुरक्षा मानकांनुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. योग्य ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक तसेच धोक्याची सूचना देणारे फलक बसवावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र, या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कष्टकरी कुटुंबाचा आधार हरपला!
निशीन हा शेतकरी प्रकाश कापरे यांचा मुलगा होता. शांत, समजूतदार आणि होतकरू तरुण म्हणून तो परिसरात परिचित होता. आई-वडिलांच्या कष्टाला हातभार लावण्यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र, अवघ्या २३व्या वर्षी त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने कापरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेने देऊळगाव माळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.














