मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेअर बाजारात झालेल्या लाखो रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी आणि माहेरून पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरातील बालाजी नगर परिसरात घडली. सौ. वैष्णवी गणेश मेरत (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी मेहकर पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, सासू, सासरे आणि नणंद फरार आहेत.
मृत वैष्णवीचे वडील रतन श्रीकिसन पागोरे (रा. बारई, ता. मेहकर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वैष्णवीचा विवाह २२ एप्रिल २०२२ रोजी बाळसमुद्र येथील गणेश रामेश्वर मेरत याच्याशी झाला होता. विवाहावेळी ३१ लाख रुपये हुंडा देण्यात आला होता. तसेच आरोपींच्या मागणीनुसार २ लाख रुपये डाऊन पेमेंट भरून आणि ६ लाख रुपयांचे कर्ज काढून स्विफ्ट कारही देण्यात आली होती. त्यानंतरही उर्वरित कर्जाच्या पैशांवरून वैष्णवीचा छळ सुरूच होता.
तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये पती गणेश मेरत याने शेअर मार्केटमध्ये सुमारे २५ लाख रुपये गमावले. त्यानंतर हा तोटा भरून काढण्यासाठी वैष्णवीकडे माहेरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. विरोध केल्याने तिला मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले. पुढे नणंदेच्या लग्नासाठीही पैशांची मागणी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी आरोपींनी वैष्णवीला “शेअर मार्केटमधील तोटा भरून काढण्यासाठी माहेरून १० लाख रुपये घेऊन ये, अन्यथा जीव दे,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. २३ जून रोजी सकाळी वैष्णवीने वडिलांना फोन करून पतीकडून झालेल्या मारहाणीची माहिती देत आपल्याला जगण्याचा कंटाळा आल्याचे सांगितले. वडिलांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र काही वेळातच वैष्णवीने गळफास घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
घटनेनंतर नातेवाईक घरात पोहोचले असता दरवाजा आतून बंद होता. वैष्णवीचा तीन वर्षांचा मुलगा आयांश याने आतून दरवाजा उघडला. घरात जाऊन पाहिले असता वैष्णवी स्वयंपाकघरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
या प्रकरणी मेहकर पोलिसांनी पती गणेश रामेश्वर मेरत, सासरे रामेश्वर गुलाबराव मेरत, सासू मीना रामेश्वर मेरत आणि नणंद मोहिनी रामेश्वर मेरत (जाधव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८०(२), ८५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे हे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर अलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.












