बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल सहा जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांत नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. साखरखेर्डा, चिखली, मेहकर, खामगाव, अंधेरा आणि बुलढाणा या पोलीस स्टेशन हद्दीत ‘मिसिंग’चे गुन्हे दाखल झाले असून, एकाच वेळी इतक्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
विशेष म्हणजे, या घटनांमध्ये केवळ तरुण मुलीच नाही तर विवाहित महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे “शिकलेल्या मुली असोत किंवा संसार करणाऱ्या महिला, कोणीच सुरक्षित नाही का?” असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. दिवस असो किंवा रात्र, कोणत्याही वेळी अचानक बेपत्ता होण्याच्या घटनांनी चिंतेत भर घातली आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात ‘मिसिंग’ प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अचानक घरातून निघून जाणे, कोणालाही माहिती न देता गायब होणे, तसेच काही प्रकरणांमध्ये कागदपत्रे सोबत नेल्याच्या घटना समोर येत असल्याने या मागे काही नियोजनबद्ध प्रकार आहे का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांकडून सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यात सध्या अस्वस्थता आणि भीतीचं सावट पसरलं आहे.












