Advertisement Advertisement

घरात विकत होता पेट्रोल! अंजनी बुद्रुकमध्ये बेकायदेशीर पेट्रोल साठ्यावर पोलिसांचा छापा; २७० लिटर पेट्रोलसह ₹३४ हजारांचा मुद्देमाल जप्त…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनी बुद्रुक (ता. मेहकर) येथे विनापरवाना पेट्रोलचा बेकायदेशीर साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या धाडीत २७० लिटर पेट्रोलसह एकूण ₹३४ हजार २६४ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंजनी बुद्रुक येथील भागवत रामदास लाड (वय २५) यांच्या घरावर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान विक्रीच्या उद्देशाने कोणतीही वैध परवानगी न घेता साठवून ठेवलेले २७० लिटर पेट्रोल आणि आठ प्लास्टिक कॅन आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून पेट्रोलसह एकूण ₹३४ हजार २६४ किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले की, बेकायदेशीर इंधनसाठा आणि विनापरवाना इंधन विक्री करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ही कारवाई ठाणेदार गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली डोणगाव पोलिसांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!