शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पत्नीला समजावून परत घरी घेऊन जाण्यासाठी सासरी गेलेल्या पतीला शिवीगाळ करत लाकडी काठी व चापट-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शेगाव तालुक्यातील हिंगणा बैजनाथ येथे घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव तेजराव सोळंके (वय ४१, रा. वाघजाळ, ता. बाळापूर, जि. अकोला) यांची पत्नी कोणतीही पूर्वकल्पना न देता माहेरी हिंगणा बैजनाथ येथे निघून गेली होती. पत्नीला परत आणण्यासाठी फिर्यादी २४ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता सासरी गेले. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पत्नीचे भाऊ अमरसिंग श्रीराम डोंबरे (वय ४५), श्रीराम डोंबरे (वय ३७) आणि रोषण डोंबरे (वय २८, सर्व रा. हिंगणा बैजनाथ, ता. शेगाव) यांनी त्यांना पत्नीबाबत कोणतीही माहिती न देता वाद घातला.
तक्रारीनुसार, तिघांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी काठीने हात व पायावर वार करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले.
घटनेनंतर फिर्यादीने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ४६९/२०२६ दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि वादाची पार्श्वभूमी तपासली जात आहे.














