देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा शहरात मध्यरात्रीच्या सुमारास खाद्यतेलाचे टँकर दाखल होत असून, त्यातील तेल ड्रममध्ये उतरवून पुढे लहान डबे व कंटेनरमध्ये भरून बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या प्रकारामुळे खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, संबंधित तेलाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा शहरातील काही ठिकाणी खाद्यतेलाचे टँकर येतात. त्यानंतर टँकरमधील तेल मोठ्या ड्रममध्ये उतरवून दुसऱ्या दिवशी विविध डबे व कंटेनरमध्ये भरून किरकोळ विक्रेत्यांकडे पुरवठा केला जात असल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण व्यवहार रात्रीच्या अंधारात होत असल्याने पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
भेसळीचाही संशय व्यक्त…
हे तेल नेमके कुठून येते, त्यावर आवश्यक गुणवत्ता चाचण्या झालेल्या आहेत का, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे पालन केले जाते का, तसेच या तेलात कोणत्याही प्रकारची भेसळ केली जाते का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. खुल्या स्वरूपात विक्री होणाऱ्या खाद्यतेलामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह…
रात्रीच्या वेळीच तेलाची उतराई आणि वितरण का केले जाते, संबंधित व्यवहारांवर अन्न व औषध प्रशासन किंवा अन्न सुरक्षा विभागाकडून नियमित तपासणी केली जाते का, तसेच या व्यवहारांना आवश्यक परवानग्या आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कठोर कारवाईची मागणी…
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य चंद्रकांत खरात यांनी या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “मध्यरात्री येणाऱ्या खाद्यतेलाच्या टँकरची वस्तुस्थिती प्रशासनाने तपासली पाहिजे. खुले खाद्यतेल व इतर खाद्यपदार्थांची नियमित तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड स्वीकारता कामा नये.”













