देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): इसरुळ परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमध्ये आणखी एका धाडसी चोरीची भर पडली आहे. २६ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी जिजाऊ अॅग्रो एजन्सी अँड इलेक्ट्रिक या दुकानाचे शटर उघडून तब्बल १ लाख ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्तीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नामदेव शिंगणे (वय ५७, रा. देऊळगाव मही) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ व ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २६ जुलै रोजी रात्री साडेआठ ते २७ जुलै रोजी पहाटे पाच वाजेदरम्यान घडली. चोरट्यांनी दुकानाच्या लोखंडी शटरचे नट-बोल्ट उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील गल्ल्याजवळ ठेवलेल्या पिशवीतील उसनवारीचे ₹१ लाख ५० हजार आणि दुकान मालकाची ₹४० हजारांची रोकड, असा एकूण ₹१ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक मोहोळकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, खामगाव–जालना महामार्गावरील देऊळगाव मही परिसरात अलिकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप व्यापारी व ग्रामस्थांनी केला आहे. अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप उलगडा न झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. रात्रीची पोलीस गस्त वाढविणे, संशयितांवर प्रभावी नजर ठेवणे आणि चोरीच्या घटनांचा तातडीने उलगडा करण्याची मागणी व्यापारी व ग्रामस्थांकडून होत आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून विविध दिशांनी तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.













